२ फेब्रुवारी २०२१, मंगळवारचा दिवस, संध्याकाळचे ५ वाजलेले.. एका हातात चहाचा कप, एका हातात पेपर.. १५ वर्ष आर्मी मध्ये देशसेवा करून उरलेली वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देऊन आता निवांत झालेले आमचे बाबा. अचानक बाहेरून आवाज येतो, " जोशीजी है क्या?" तो पहाडी आवाज ऐकून बाबा बाहेर
येतात. समोर दोन जवान कडक युनिफॉर्म मध्ये उभे! "गजानन रंगनाथ जोशी यहाँ रहते हैं क्या?"
बाबा त्यांना बघून आश्चर्य चकित.. "हां हां मै ही हुं" समोरून कडक सैलूट! "आईये अाईये.." बाबा त्यांना आत बोलावतात. आत येऊन बसल्यावर ते बाबांच्या हातात एक पत्र देतात, आणि आपल्या येण्याचे प्रयोजन
सांगतात. तेव्हा जो खुलासा होतो तो असा की *३डिसेंबर १९७१ ते १६ डिसेंबर १९७१ या कालावधी मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी जे युद्ध झाले त्या युद्धात भारताने दिमाखदार विजय मिळवला होता.
पाकिस्तान चे ९३००० सैनिक आपण बंदी बनवले होते. जगाच्या पाठीवर आपल्या सैनिकांनी हा एक रेकॉर्ड केला आहे. या युद्धात ३९०० सैनिक धारातीर्थी पडले होते. या घटनेला या वर्षी म्हणजे १६ डिसेंबर २०२१ रोजी ५० वर्ष पूर्ण होत आहेत.
त्यामुळे भारत सरकारने हे वर्ष वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन साजरे करायचे ठरवले आहे. त्यासाठी आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी १६ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली ला ' नॅशनल वॉर मेमोरियल ' येथे "स्वर्णीम विजय मशाल" पेटवून या अविस्मरणीय विजयाचे ५० वे वर्ष साजरे करायचे ठरवले आहे.
ही मशाल अश्या प्रत्येक सैनिकाच्या घरी जाणार ज्यांनी १९७१ या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला. या जवानांचा सन्मान केला जाणार त्यासाठी या सैनिकांचा दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी २०२१ ह्या दिवशी सकाळी १० वाजता कॅप्टन संतोष माने व त्यांची २५ जवानांचा तुकडी घरी येणार आहे.
हे ऐकून घरची मंडळी आश्चर्यचकित झाली. एवढं बोलून त्यांनी निरोप घेतला. मग तिकडे नगरला सुरू झाली माझ्या लहान भावाची आणि लहान वहिनीची कामाची लगबग. नाशिक ला फोन, भावाला पुण्याला फोन सुरू झाले. काय करायचं, कसं करायचं, किती लोकांना बोलवायचं, येणारे सैनिक किती वेळ देणार...
असे अनेक विचार सुरू झाले.
काही तासांत, एका छोटेखानी कार्यक्रमाची तयारी झाली.आणि इकडे आम्हा सर्वांची निघण्याची धांदल उडाली. उत्साह, आश्चर्य, बाबांबद्दल, देशाबद्दल मनात दाटून आलेला प्रचंड अभिमान. येणाऱ्या त्या मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वस्व वाहणाऱ्या सैनिकांचे स्वागत
चांगले कसे होईल ह्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स सुरू झाले. आम्ही रात्री १ वाजता नाशिक वरून नगर ला पोहचलो. भाऊही पोहोचलाच होता. आमच्या बाबांचा होणार हा सन्मान फक्त फोटो किंवा व्हिडिओज मधून बघण्यात काय अर्थ होता? प्रत्यक्ष डोळ्यांमध्ये हा प्रसंग सामाऊन घेण्यात खरी धन्यता होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी २०२१ ह्या दिवशी कॅप्टन श्री. माने व त्यांची टीम आर्मी च्या जिप्सी गाडीमध्ये ती *"स्वरणीम विजय मशाल"* घेऊन हजर झाली. अंगणामध्ये आधीच तयार केलेल्या छोट्या स्टेज वर जय हिंद आणि भारत माता की जय च्या जय घोषात, ती तळपती मशाल विराजमान झाली.
१९७१ च्या युद्धात प्राणार्पण केलेल्या आणि इतरही हजारो सैनिकाच्या घरी जाऊन, आज ही मशाल आमच्या उंबरठयावर आली होती!! तिच्याकडे बघताना मनात दाटून आलेले असंख्य विचार, त्यासोबत आईबाबांच्या आयुष्याचा पट नजरेसमोर तरळून गेला.
बाबांकडून ऐकलेल्या, युद्ध कथा ज्यामध्ये बाबा ४-५ वेळेस मृत्युला अक्षरशः गळाभेट देऊन परत आलेले... ऐकून आजही अंगावर काटा येतो. इकडे शिक्षकेची नोकरी सांभाळून आईने बाबांना दिलेली साथ सगळ्या सगळ्याचं चीज झालंय असं वाटून गेलं. कृतकृत्य झालेला बाबांचा चेहेरा आजही नजरेसमोरून जात नाही.
कार्यक्रम ९० मिनिटे चालला. काही मित्र मंडळी व नातेवाईक यांनी उत्स्फूर्त पणे शब्दसुमने उधळली. शेवटी, कॅप्टन संतोष माने यांनी ह्या उपक्रमाची माहिती त्यांच्या शब्दात सांगून भारतीय सेनेतर्फे बाबांचा आणि बाबांसोबत, बाबांचे मित्र आणि बांग्लादेश युद्धातील सहभागी माजी सैनिक
श्री विनायक कुलकर्णी काकांचा सत्कार केला.
हे सैनिक देशासाठी तळहातावर प्राण घेऊन लढत असतात. ह्याची आपल्याला जाणीव असते पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही प्रमाणात आपण हे विसरून जातो. पण भारत सरकारच्या ह्या उपक्रमामुळे देशप्रेमाची ती आग त्या ज्योतिद्वारे पेटवत ठेवण्याचे काम
मात्र नक्की होत आहे, असे म्हणता येईल.
या सरकारने ह्या सर्व वयोवृध्द सैनिकांसाठी, आयुष्याच्या ह्या टप्प्यावर त्यांच्या दारात येऊन त्यांचा केलेला सन्मान अनोमोल ठरतो. या सरकारचे आणि भारतीय सैनिकांचे जितकी आभार मानावे तितके कमीच आहेत.
१६ डिसेंबर १९७१ नंतर, गेल्या ५० वर्षात हे कोणत्याही सरकारच्या लक्षात आले नाही हे खेदजनक आहे. असो... पण एक मात्र खरे, की ३ फेब्रुवारी २०२१ वार बुधवार हा दिवस जोशी कुटुंबियांसाठी एक अविस्मरणीय दिवस ठरला.

शब्दांकन - माधुरी जोशी रहाटकर.
You can follow @nackool.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.