कुठलाच आजार नव्हता त्यांना.. वय पण ६५-७०.. पण आजी नियमीत फिरायला जायच्या. चहा बिनसाखरेचा तोही फक्त सकाळी. नाश्ता, जेवण अगदी प्रमाणात. शुगर नाही, बीपी नॉर्मल. एखादं देवाचं पुस्तक, ग्रंथ, पुराण रोज वाचायच्या. स्वभाव शांत, बडबड नाही, काही विचारलं तर तेवढ्यास तेवढं बोलणं (१)
आज नेहमी प्रमाणे उठल्या, फिरून आल्या, आंघोळ केली, चहा, नाश्ता केला व नेहमी प्रमाणे त्यांच्या खोलीत गेल्या, देवाचं वाचायला. मुलगा, सून व नात नाश्ता करत होते. थोड्या वेळात आजीच्या खोलीतून घंटी वाजवायचा नेहमीचा आवाज येतो तसा आला नाही असं नात म्हणाली. (२)
तुझ्या आजीनी सायलेंसर लावला असेल मुलगा मजेत म्हणाला. चहा नाश्ता झाल्यावर सून सहज म्हणून आजीच्या खोलीत गेली तर आजी त्यांच्या बेडवर पडलेल्या. सूनेच्या छातीत धस्स झालं. धावपळ सुरू झाली. शेजारीपाजारी आले. ॲम्ब्युलन्सची वाट बघण्यापेक्षा पटकन कारनी जवळच्या हॉस्पीटलमधे नेलं. (३)
पण तिथे ॲडमीट करायची वेळ आली नाही. आजी अगोदरच गेल्या होत्या. थोड्या वेळापुर्वी अवतीभवती वावरणारी व्यक्ती अशीच निघून जाते? जीवन अनिश्चीत असतं, शक्य अशक्य घटनांनी व्यापलेलं असतं पण सर्वात निश्चित असतो मृत्यू आणि त्याची वेळ सर्वात अनिश्चित. तो त्याच्याच चालीने येतो. (४)
मागे उरलेली नाती शोक करतात. माझं कसं होणार, हे कोण करणार, ते कोण करणार, आठवणी काढून रडणार. निष्प्राण देहाला पाहून जाब विचारणार का सोडून गेला. जाती धर्माची ओझी त्या देहानीच उचललेली असतात. मृत्यूनंतरही तो देह जाती धर्माचे संकेत पाळतो. (५)
जे काही क्रियाकर्म असतील ती तो देह निमूट करून घेतो. आणि आत्मा जो खरा चालक असतो, हे नातेसंबंध, मित्रपरीवार सर्व जोडतो, तो मात्र निमूटपणे निघून गेलेला असतो.. नवा प्रवास सुरु करायला.