#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार
चंद्रपूर,रायपूर,ईस्ट गोदावरी वैगेरे जिल्हे म्हणजे आदिवासीबहुल क्षेत्र. अगदी पुरातन काळापासून या भागात राजगोंड,माडिया,बडा माडिया यांसारख्या कैक आदिवासी जमातींची वस्ती आहे. साधारण १९७१ सालापासून या भागात नक्षलवाद फोफावला आणि या भागातील
आदिवासी जमाती तशा दुर्लक्षितच राहिल्या.परंतु या आदिवासी जमातींचा सातासमुद्रापार नावाजला गेलेला एक विशेष गुणधर्म म्हणजे या आदिवासी जमातींचे शिकार करण्याचे पद्धती तंत्र. हे आदिवासी सर्वप्रथम जंगलातल्या नेमक्या कोणत्या क्षेत्रात शिकार करायची आहे ते क्षेत्र निश्चित करतात.
मग त्या ठरलेल्या क्षेत्राला अशा रीतीने वेढा देतात कि वेढा आवळल्या गेल्यावर जनावराला पुढे जायला एकच लहानसा मार्ग उरेल. चारही बाजूने घेरून त्या जनावराला खिंडीत पकडून शेवटाला बांधलेल्या दोरांच्या मजबूत जाळीत अडकवायचं आणि अखेर त्या जनावराचे सगळे मार्ग बंद करून त्याची शिकार करायची.
मित्रांनो अगदी याच जनावराप्रमाणे भारताची मागील १०० वर्षांपूर्वी केविलवाणी अवस्था झाली होती. चारही बाजूने भारताला घेरल्या गेलं होत. जाळीचे दोरही घट्ट करण्यात आले होते. पण समोर असणाऱ्या निमुळत्या खिंडीतून मोहनदास गांधी नावाच्या इसमाने भारताला सुखरूप बाहेर काढले.
कसे ते या थ्रेड मध्ये समजून घेऊयात. जवळपास १९१८ सालाच्या अखेरीस पहिल्या महायुद्धाची अखेर झाली. या युद्धात जर्मनीला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला.त्यामुळे जर्मनीत साधारण याच कालखंडात उग्र राष्ट्रवाद उफाळून येण्यास सुरुवात झाली.
याच उग्र राष्ट्रवादातून हिटलरच्या नाझीवादाने जन्म घेतला आणि अखेरीस १९३३ साली हिटलरने जर्मनीची सूत्रे आपल्या हाती घेऊन नाझीवादाचं क्रूर प्रदर्शन सुरु केलं. दुसरीकडे रशियात लेनिनच्या मृत्यूनंतर जोसेफ स्टालिन याने रशियात सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेत राष्ट्रनिर्माणासाठी केवळ
हिंसा हा एकमेव पर्याय आहे असं म्हणत त्याने आपल्या विरोधात जाणाऱ्या हजारो रशियनांची कत्तल सुरु केली. तिकडे इटलीमध्ये लोकभावनांवर स्वार होत मुसोलिनीने अगदी अलगदपणे आपला फॅसिस्टवाद लोकांच्या गळी उतरविण्यास सुरुवात केली होती. आशिया खंडात फार बरी परिस्थिती होती असे मुळीच नव्हे.
कारण याच कालावधीत चीनमध्ये माओ-त्से-तुंग हा सत्तेवर होता आणि त्याने त्याचा लॉंग मार्च याच काळात काढायला सुरुवात केली होती. जपानमध्ये याच सुमारास टोकियो शहरात मार्शल लॉ लावण्यात येऊन विरोधकांची बेसुमार कत्तल सुरु होती आणि जपान एका क्रूर हुकूमशाहीकडे प्रवास सुरु करत होता.
हे कमी म्हणून कि काय तर भारतात मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा पदोपदी आपला फणा बाहेर काढतच होत्या. म्हणजे एकंदरीत मी वर म्हटल्याप्रमाणे त्या आदिवासींच्या तावडीतील जनावराप्रमाणे भारत देश चारही बाजूने हिंसक शिकाऱ्यांनी घेरला गेला होता. एका बाजूने नाझीवाद,दुसऱ्या बाजूने फॅसिस्टवाद,
तिसऱ्या बाजूने रक्तरंजित मार्क्सवाद, आणि चौथ्या बाजूने कट्टर धार्मिकता. परंतु तरीही गांधीबाबांनी अगदी कुशलतेने भारताला समोर असणाऱ्या निमुळत्या खिंडीतून सुखरूप बाहेर काढलं. कारण राष्ट्रनिर्माणासाठी केवळ हिंसा हेच योग्य माध्यम आहे असे चहुबाजूने वातावरण असताना गांधींनी भारताला
अहिंसेच्या मार्गाने नेले.आणि भारताची शिकार होता होता राहिली. उदाहरणादाखल म्हणून पाहायचे झाल्यास आपल्याला विनोबा भावे आणि अरविंद घोष या व्यक्तिमत्वांकडे पाहता येईल.हि दोन माणसं अगदी बॉम्ब बनविण्याच्या तयारीत होती.पण गांधींच्या प्रभावाखाली येत त्यांनी बॉम्ब ऐवजी गीता हातात घेतली.
सरहद्द गांधी म्हणून परिचित असणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांनी आपल्यासोबत तब्बल १ लाख पठाणांना आपल्या बंदुका खाली टाकायला लावून गांधींचा अहिंसेचा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडले. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला सापडतील. यावरून लक्खपणे असे लक्षात येते कि गांधींमुळे भारताच्या
स्वातंत्र्याला खरे नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले. भारताचे स्वातंत्र्य कोणत्या मूल्यांच्या आधारावर मिळेल याबाबत एक व्यापक चौकट गांधींनी आखून दिली. म्हणूनच आज एकविसाव्या शतकात तुम्ही आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतोय. याच ऐतिहासिक कारणामुळे मला गांधी
खऱ्या स्वातंत्र्याचे शिल्पकार वाटतात, इतरांपेक्षा कैकपटीने वेगळे आणि धाडसी वाटतात. या प्रसंगी मला सुरेश भटांची एक सुंदर कविता प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते;
दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी|
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही||
#SiddharthNaik
You can follow @siddharthsuffi4.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.