#खऱ्यास्वातंत्र्याचेशिल्पकार
आज मी गांधींच्या राजकारण प्रवेशाबाबत थोडं विवेचन करणार आहे, इ.स. १९१५ साली गांधीजींचा भारतात प्रवेश झाला. आणि मग विविध आंदोलने, चळवळी, उपोषणे, निवडणुका या सगळ्या खटाटोपानंतर गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
आज मी गांधींच्या राजकारण प्रवेशाबाबत थोडं विवेचन करणार आहे, इ.स. १९१५ साली गांधीजींचा भारतात प्रवेश झाला. आणि मग विविध आंदोलने, चळवळी, उपोषणे, निवडणुका या सगळ्या खटाटोपानंतर गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

हे आपल्याला अगदी तोंडपाठ असते. पण त्याच्या खोलात जाण्याचा किंवा त्याच्यामागचा कार्यकारणभाव समजावून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. जे गांधी साध्या झुरळाला घाबरायचे, अंधाराला घाबरायचे त्या गांधींनी इंग्रजांपुढे काठी रोवून उभे राहण्याचे धैर्य कुठून आणले असेल?

बरं भारतात येण्याआधी गांधीजींची जीवनशैली तपासू जाता आपल्याला गांधी कायद्याचे विद्यार्थी कमी आणि अध्यात्मिक धर्मगुरूच जास्त वाटतात. कारण सातत्याने विविध धर्मग्रंथांचा अभ्यास करणे, प्युरिटन संप्रदायाच्या सभेला न चुकता उपस्थित राहणे,अगदी पॅरिसला जाऊन तिथल्या भव्य चर्चेस मध्ये

तासंतास रमणे,पोप ची भेट घेऊन अध्यात्मावर चर्चा करणे. हे सगळं पाहता हा माणूस राजकारणासारख्या रूढार्थाने मळलेल्या वाटेने जाईल असे कुणाला स्वप्नातही वाटणे शक्य नव्हते. पण तरीही गांधी राजकारणात आले आणि पुढे मार्गक्रमणही केले.हा चमत्कार म्हणावा असा बदल कसा काय झाला गांधींमध्ये?

खरंच बदल झाला का? तर ह्याच प्रश्नाचा किंवा गांधींच्या मानसिक अवस्थेचा माग घेतला असता काही तार्किक गोष्टींचा मला उलगडा झाला. हि तार्किक गोष्ट जर आपण समजून घेतली तर नक्कीच आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ उलगडण्यास मदत होईल आणि काही अंशी गांधींचीहि एका ठाशीव चौकटीतून

मुक्तता होण्यास मदत होईल. त्यासाठी आपल्याला आता गांधींच्या मनोविश्वात आणि विचारविश्वात प्रवेश करायला हवा. गांधी म्हणत असत कि मनुष्य आणि पशु हे एकाच सृष्टीची दोन लेकरं आहेत. ज्याप्रमाणे पशूला काम, क्रोध, भूक, तहान या प्रेरणा आहेत अगदी मनुष्यालाहि अशाच प्रेरणा सृष्टीने

बहाल केल्या आहेत. परंतु सृष्टीने मनुष्याला या प्रेरणांबरोबरच सदसतविवेकबुद्धीची(conciousness ) अधिक देणगी बहाल केली आहे. तेव्हा मनुष्याने त्याला मिळालेल्या या देणगीचा यथार्थ वापर करून आपल्यातील पशुत्वार मात करून आपल्या अंतरंगात असणाऱ्या "चैतन्य- तत्वाचा" नेहमीच शोध घेतला पाहिजे

जेणेकरून त्याला स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेता येईल,स्वतःची नैतिक पातळी उंचावत येईल. असे गांधीजींचे आग्रही मत होते.परंतु याही पुढे जाऊन गांधीजी असे म्हणतात,कि शेवटी मनुष्यही याच सृष्टीचा भाग असल्याने त्याला स्वतःच्या अशा काही किमान जैविक गरजा असतात त्या भागवत आल्या पाहिजेत

अन्यथा त्याचा 'नैतिक विकास' निव्वळ अशक्य आहे.आणि ते खरेही आहे. या प्रसंगी राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'रंगीला' चित्रपटाची मला आठवण होतीये. या सिनेमातील मुख्य नायक असलेला अमीर खान आपल्याला विविध पातळ्यांवर मोठा संघर्ष करताना दिसतो,

हा मुख्य नायक असाच एके दिवशी रस्त्याने चालत असताना केळेवाल्याच्या गाडीवरचं एक केळ सहजपणे उचलून पुढे चालायला लागतो. तेव्हा तो केळेवाला त्याला बराच झापतो. त्यावर अमीर खान म्हणतो कि: "एक हि केला लिया ना, 'तेरी पुरी गाडी तो नही खा गया मै"!

आता आमीरखानचे हे उत्तर ऐकून आपल्या लक्षात येईल कि आपलं काही चुकलं आहे किंवा आपण अयोग्य गोष्ट केली आहे हे त्याच्या गावीच नाहीये. आता या ठिकाणी गांधीजींचं म्हणणं किंवा त्यांचं अर्ग्युमेण्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवू लागत, ते म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या किंवा

रोजच्या जगण्याच्या लढाईत माणसाला नैतिक-अनैतिकतेची चैन कदापि परवडणारी नसते. म्हणूनच जर सामान्य लोकांमध्ये अध्यात्मिक विकासाची ओढ निर्माण करायची असेल तर प्राधान्यक्रमाने त्यांच्या प्राथमिक गरजा भागविणे आवश्यक आहे असे गांधीजींचे स्पष्ट मत होते.

आता गांधींच्या याच युक्तिवादात त्यांच्या राजकारण प्रवेशाचे इंगित दडले आहे. ते असे कि: तत्कालीन भारतात लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त वर्गाला दारिद्र्यामुळे पशूहूनही नित्कृष्ट दर्जाचे जीवन जगावे लागत होते. आता या लोकांमधेय उच्च दर्जाचा नैतिक विकास घडवून आणायचा असेल

तर त्यांच्या प्राथमिक गरजा भागविणे आवश्यक होते.परंतु त्यात सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे ब्रिटिशांची परकीय राजवट. कारण ब्रिटिशांनी अनेक वर्ष चालवलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळेच भारतात भीषण दारिद्य निर्माण झाले होते हे गांधीजींचे पूर्वसुरी असणारे दादाभाई नौरोजी,

महादेव गोविंद रानडे इत्यादी प्रभृतींनी पुराव्यानिशी सिद्ध केले होते. आणि हे सत्य गांधींना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे निष्कर्षाप्रत येताना गांधीजींनी आपल्या मनाशी पक्के केले होते कि परकीय राजवट घालवून स्वकीयांची राजवट(स्वराज्य) प्रस्थापित झाल्याशिवाय भारतातील दारिद्र्य

काही नाहीसे होणार नाही आणि परिणामस्वरूप भारतीयांची अध्यात्मिक आणि नैतिक उन्नतीही आपल्याला साधता येणार नाही. त्यामुळेच गांधीजींनी राजकारणाची मळलेली वाट धरली. परंतु मनुष्याचा "अत्युच्च नैतिक विकास" हेच गांधीजींचे अंतिम उद्दिष्ट होते हे आपल्याला समजून घेतले पाहिजे.

म्हणजेच फुले असतील, डॉ आंबेडकर असतील यांनी जी मानवमुक्तीची चळवळ चालवली होती तीच चळवळ गांधींनी थोड्या वेगळ्या मार्गाने पुढे नेली असे आपल्याला काही अंशी म्हणता येईल.
#सिद्धार्थ
#खऱ्यास्वातंत्र्याचेशिल्पकार
#सिद्धार्थ
#खऱ्यास्वातंत्र्याचेशिल्पकार