आंतरराष्ट्रिय दबावाला न जुमानता तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगाननी हागिया सोफिया(आया सोफिया) संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करण्याची घोषणा केली.
तुर्कीच्या सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयानंतर आता ८६ वर्षांनंतर पुन्हा एकदा २४जुलैला मुस्लिम बांधव तिथे प्रार्थना करणार आहेत
#IRMarathi
काॅन्स्टॅन्टिनोपल (इस्तांबुल) मध्ये स्थित जवळपास १०००वर्ष ग्रीक आॅर्थोडाॅक्स ख्रिश्चन चर्च, ५००वर्ष मशिद, ८६वर्ष संग्रहालय आणि UNESCOकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त अशा अतिशय सुंदर, भव्यदिव्य असणार्‍या आया सोफियाचा १५०० वर्षांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ.
#AyasofyaCamii
बायझेंशन शहराची स्थापना बायझसने (ग्रीक वसाहत) केली. पहिला ख्रिश्चन सम्राट काॅन्स्टॅन्टाईनने जिंकल्यानंतर या शहराची "काॅन्स्टॅन्टिनोपल" नावाने "काॅन्स्टॅन्टाईन द ग्रेट"च्या साम्राज्याची राजधानी म्हणून भरभराट झाली,ज्याने पश्चिम आणि पूर्व रोम एकत्र केले (त्याला तो नविन रोम म्हणायचा)
त्याच्या मृत्युनंतर वारस काॅन्स्टॅन्टिनसने या शहरात धार्मिक वास्तु बनवण्याचे ठरवले. त्याने बांधलेल्या वास्तुंपैकी एक वास्तु आया सोफीया.
Hagia- ईस्टर्न चर्च मध्ये पवित्र येशूच्या अंतिम भोजनाच्या स्मृत्यर्थ होणारा समारंभ.
Sophia- wisdom किंवा त्रिमुर्तीमधील दुसरी व्यक्ती- ख्रिस्त)
चर्चचे प्रथम नाव होते मेगाले एक्कलेसिया (भव्य चर्च) पहिली आया सोफीया काॅन्स्टॅन्टिनस२ च्या मदतीने इ.स.३६०मध्ये मुर्तीपुजक (pagan) मंदिराच्या जागेवर बांधली गेली. ती लाकडी छताची होती. सन ४०४च्या उठावावेळी जाळपोळीत या चर्चचेही नुकसान झाले. ४१५मध्ये थियोडोसियसने त्याची डागडुजी केली.
५३२मध्ये जस्टिनियन प्रथमविरूद्ध झालेल्या निका उठावात ही चर्च पुन्हा जळून खाक झाली (उत्खननात त्याचे तुकडे मिळाले ते आजही पहायला मिळतात). जस्टिनियनने तिची डागडुजी केली (सद्यस्थितीत पहायला मिळते ते रूप), पाच वर्षांच्या या बांधकामानंतर ५३७ मध्ये प्रार्थनेसाठी खुली करण्यात आली.
हे मोझॅक (संगमरवरी दगड/काचेचे तुकडे बसवुन केलेले सुशोभित नक्षीकाम) बायझंटाईन वास्तुशैलीचा सर्वांत टिकून राहिलेल्या उदाहरणांपैकी एक उत्कृष्ट नमुना आहे. आया सोफीयाचं हे तिसर्‍यांदा पुनर्निमाण होते.
सन ५५८मधील भुकंपात मुळचा घुमट कोसळला डागडुजीनंतर ५६३मध्ये पुन्हा हा घुमट कोसळला.
पुढे घुमट अधिक सुरक्षित करण्यासाठी पावले उचलली गेली. ९८९ व १३४६ मध्ये या घुमटाचा काही भाग कोसळला. इतिहासात बर्‍याच वेळा त्याचे घुमट कोसळले होते आणि नंतर वजनाने हलके असलेल्या सामग्रीसह त्याचे पुन्हा बांधकाम केले गेले. कित्येक वर्ष ही जगातील सर्वात मोठे घुमट असलेली वास्तू होती.
आया सोफिया 900 वर्षांहून अधिक काळ कॉन्स्टँटिनोपलच्या ऑर्थोडॉक्स धर्मोपदेशकांचा, चर्च परिषद, शाही समारंभांचे प्रमुख स्थळ होते.
१२०४ मध्ये या कॅथेड्रलवर क्रुसेडर्सनी क्रुर हल्ला केला, कॉन्स्टँटिनोपलच्या धर्मोपदेशकाला काढून टाकले, त्यांची जागा लॅटिन धर्मोपदेशकाने घेतली.
या आक्रमनात मृत पावलेला सेनापती एनरिको डॅन्डोलोचे थडगे आया सोफियाच्या आत आहे. हा हिंसक झटका असूनही, आया सोफिया १४५३पर्यंत चर्च म्हणून कार्यरत होती. काॅन्स्टॅन्टिनोपलवर तुर्कांच्या विजयापुर्वी आया सोफीयाच्या घुमटाला तडे गेले,तेव्हा बायझंटाईन सम्राटाने आॅट्टोमन सम्राट सुलतान मुराद२
याच्याकडे मदत मागितली होती. अली नज्जर या आर्किटेक्टला एडिर्नेहून पाठविण्यात आले व इमारत वाचली. त्याने परत आल्यावर सुलतानला सांगितले की मी मिनारांसाठी जागा तयार केली आहे (यातूनंच स्पष्ट झाले होते की आॅट्टोमन एकदिवस काॅन्स्टॅन्टिनोपलवर आक्रमण करून आया सोफियाचे मशिदीत रूपांतर करतील)
२९ मे १४५३ मध्ये ओट्टोमन सुलतान मेहमत कॉन्स्टँटिनोपल शहरात प्रवेश करतो,तेव्हा बायझेंटाईन लोकांनी बचावासाठी हाया सोफियात आश्रय घेतला होता, तिथे कॅथलिक मरीया(virgin mary) ची प्रार्थना करण्यात आली. मेहमत विजयी झाल्यावर त्याने आया सोफियाच्या उद्ध्वस्त घुमटावर चढून पर्शियन दोहा वाचला.
ज्यात उल्लेख होता, इस्लामनुसार युद्धात जिंकलेली प्रार्थनास्थळं सुलतानच्या मालकीची असतील आणि त्याने तिथे प्रार्थना करून चर्चचे शाही मशिदीत रुपांतर केले.
आया सोफिया पुढे ५०० वर्ष इस्तांबुलची प्रमुख मशिद म्हणून कार्यरत होती. सुरूवातीला तिच्या रचनेत कोणतेही मोठे बदल केले गेले नाहीत.
नंतर इस्लाममध्ये असलेल्या प्रतिमांच्या निषीद्धपणामुळे चर्चच्या चित्रकला,अलंकारिक प्रतिमा,दर्शविलेले चेहरे प्लास्टरने झाकण्यात आले.
सुलतान मेहमद२ने वास्तुची डागडुजी केली,मिनार बांधला.नंतर मुलगा बायेझिद२ने दुसरा मिनार,नातू सलिम२ने अजून २मिनार बांधले. त्यामुळे मिनार वेगवेगळे दिसतात.
सलिम२ ने आया सोफियाच्या विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला, १५७४मध्ये ते पूर्णपणे पुनर्संचयित केले. सलिम२ व चार इतर वंशज सुलतानांना आया सोफियाच्या प्रांगणात दफन करण्यात आले.
महमुत१ ने १७३०-१७५४ मध्ये या मशिदीजवळ वाचनालय,कारंजा,भव्य किचन आणि मदरसा बांधली.
वाचनालय आया सोफीयाच्या दक्षिणेकडे पहिल्या मजल्यावर आहे. ती एक आयताकृती खोली आहे ज्यात भींतींचा अर्धाभाग मार्बलचा आहे, पुर्वेकडे महमुत१ची तुग्रा (कॅलिग्राफीक सही) आहे. लायब्ररीच्या पुढच्या बाजूला सहा स्तंभ आहेत आणि त्यामध्ये आतील भाग बंद करणार्‍या ब्राॅन्झ ग्रिल आहेत.
अब्दुलमेसिद२ च्या काळात (१८४७-४९) आया सोफीयाचे सर्वात प्रसिद्ध जिर्णोद्धार झाले,यासाठी स्वीस आर्किटेक्ट्सना आमंत्रित केले गेले होते. आॅट्टोमनांच्या काळात आया सोफीयामध्ये पैगंबरांचा वाढदिवस व अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे होत. या मशिदीला इस्तांबुलच्या स्वतंत्रतेचे प्रतिक मानले जाई.
पहिल्या महायुद्धात १९१८ला इंस्ताबुलमध्ये जेव्हा मित्र राष्ट्रांचे आक्रमण झाले, तेव्हा काही ग्रीक लोकांनी आया सोफीयाच्या छतावरील घंटा वाजवून मशिदीचं चर्चमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. सुलतान वहिदेद्दीनने स्वतःच्या संरक्षणार्थ असलेल्या ७०० सैनिकांपैकी काहींना आया सोफियाभोवती
वेढा देण्यास सांगितले,तसेच जो छतावर चढण्याचा प्रयत्न करेल त्याला गोळ्या घालण्याची सुचना दिली. मशिदीच्या भोवताली सुरूंग पेरलेली होती त्यामुळे मशिदीचे संरक्षण होण्यास मदत झाली.

पुढे १९३०च्या बाल्कन करारात अतातुर्क यांनी म्हटले होते,"जर आपण आया सोफियाला संग्रहालय घोषीत केले, तर ते
ग्रीसप्रती सद्भावना दाखवल्यासारखे असेल"
धर्मनिरपेक्षतेची नीव रचनारे अतातुर्क यांनी १९३४मध्ये आया सोफीयाला संग्रहालयाचा दर्जा दिला. नमाजासाठी असलेल्या चटया हटवल्या गेल्या, फोस्साटी बंधुंच्या सुचनेवरून प्लास्टरखाली असलेले मोसॅक शोधले गेले. तरीही बराच भाग हा प्लास्टरने झाकलेला होता.
१फेब्रु१९३५ रोजी संग्रहालय खुले करण्यात आले.
तिथे १९५०मध्ये डेमोक्रॅटीक पार्टीने प्रार्थना सुरू केल्या,पण नाटोमुळे पुन्हा माघार घेतली. असा प्रयत्न १९८०मध्ये जस्टीस पार्टीने केला पण सैनिकीबंडामुळे माघार घ्यावी लागली. मदरलॅंडपार्टीलाही १९९२मध्ये अशा निर्णयापासून माघार घ्यावी लागली.
१९९३ला UNESCOने १८० फुट उंच,३६१ दरवाजे असलेल्या या वास्तूला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. UNESCO च्या नियमानुसार दर्जा देतेवेळी वास्तू ज्या स्वरूपात होती त्याच स्वरूपात पुढेही असणं आवश्यक आहे.
(संग्रहालयाला आता मशिद घोषित केल्यावर WHS चा दर्जा काढून घेतला जाईल अशी शक्यता आहे)
२०१४ला एर्दोगान सत्तेत आल्यापासून तुर्कीची वाटचाल ईस्लाम राष्ट्राकडे सुरू आहे,एर्दोगानसमर्थकांना आता नवओट्टोमनयुगाची स्वप्नं पडत आहेत. आया सोफीया संग्रहालयाला पुन्हा मशिद बनवण्याच्या घोषणेनंतर एर्दोगान यांच्यावर जगभरातून टीका होत आहे, ग्रीसमध्ये तर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय.
ग्रीसच्या पंप्रंनी या घटनेचा तीव्र निषेध केला. US SOS पोम्पेई यांनीही १०दिवसापुर्वी संग्रहालयाचा दर्जा तसाच टिकून रहावा या आशयाची प्रतिक्रीया दिली होती. रशियाकडुन सौम्य प्रतिक्रीया आली. या निर्णयामुळे इस्लाम-ख्रिश्चनांमध्ये तणाव निर्माण होऊ नये अशी आशा जगभरातून व्यक्त केली जातेय.
आया सोफिया बायझंटाईन-काळातील वास्तू आहे,पण ती आजही तेथे उभी आहे ते तुर्कांमुळे;या दृष्टीकोनातून काहीजण तिला बायझंटाईनऐवजी ओट्टोमनांची वास्तू समजतात.
पण ती एक चर्च होती ज्यावर आक्रमण करून मशिद बनवली गेली व आज ते ख्रिश्चन-इस्लाम मिलाप असलेले धर्मनिरपेक्षतेचं प्रतिक आहे,हे सत्य आहे.
You can follow @Brightstar_KC.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled:

By continuing to use the site, you are consenting to the use of cookies as explained in our Cookie Policy to improve your experience.